मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद झाल्याने विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहिले. या कठीण काळातही अनेक शिक्षक आणि संस्थांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाशी अनुबंध टिकून राहिला. 'स्व'-रूपवर्धिनी संस्थेने राबवलेला 'जाणुया कोरोनाला - जाणूया विषाणूला - दूर ठेवू आजारांना' हा उपक्रम विशेष उल्लेखनीय आहे.
ही संस्था विज्ञान शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी. त्यांची 'विज्ञान तंत्रज्ञान फिरती प्रयोगशाळा' विद्यार्थ्यांना प्रयोगांची संधी उपलब्ध करून देते, जे विज्ञान शिक्षणात अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या काळातही विद्यार्थ्यांना कोरोना आणि विषाणूविषयी योग्य माहिती देण्यासाठी हा उपक्रम राबवला गेला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी ३० प्रश्नांची उत्तरे ऑनलाईन पद्धतीने दिली. डॉ. राजेंद्र देवपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे विषाणूविषयीचे आकलन वाढले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील कुतूहल जागृत झाले आणि शिकण्याचा आनंद मिळाला.
'स्व'-रूपवर्धिनीचे श्री. विश्वास कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्यांचे या यशस्वी उपक्रमाबद्दल मनापासून अभिनंदन!
— डॉ. पंडीत विद्यासागर
आज पुणे शहर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कठोरपणे सामोरे जात आहे. अनेक लोकांनी आपले प्रियजन गमावले आहेत. महानगरपालिकेचे कर्मचारी या मृतांच्या अंत्यसंस्काराचे काम करत आहेत. या कामात ‘स्व'-रूपवर्धिनी, ‘सेवा सहयोग’, आणि ‘सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प’ या स्वयंसेवी संस्थांचे चाळीसहून अधिक कार्यकर्ते ससून रुग्णालयाच्या मयत पास केंद्रात आणि वैकुंठ स्मशानभूमीत अखंड सेवा देत आहेत.
मी स्वतः भेट दिली तेव्हा मला त्यांच्या शिस्तबद्ध कामाची कल्पना आली. मयत पास केंद्रात २४ तास युवक-युवती उपलब्ध असतात, त्यामुळे पास लवकर मिळतात. स्मशानभूमीत सरण रचणे, चिता लावणे, अस्थी गोळा करणे, आणि दुःखी नातेवाईकांसाठी पाणी व बसण्याची व्यवस्था करणे, अशी अनेक चांगली कामे ही संस्था करत आहे.
‘स्व-रूपवर्धिनी’चे युवक बेवारस मृतदेहांचे दहन आणि संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह असल्यास अग्नी देणे, अशी कामेदेखील मनोभावे करत आहेत. ‘स्व-रूपवर्धिनी’चे कार्यवाह श्री. विश्वास कुलकर्णी यांनी सांगितले की, आम्ही या कठीण काळात सर्व प्रकारे तुमच्यासोबत आहोत. मला यावेळी ‘स्व-रूपवर्धिनी’चे भूतपूर्व कार्यवाह स्व. ज्ञानेश पुरंदरे (ज्ञापु) यांची आठवण आली. ‘आम्ही सारे ज्ञापु’ या भावनेने सारे कार्यकर्ते काम करत आहेत, हीच ज्ञापुंना दिलेली योग्य श्रद्धांजली आहे.
— महापौर श्री. मुरलीधर मोहोळ
नाव: आराध्या आकाश गायकवाड
गट: मधला गट
विषय: शाळेत आल्यापासून झालेली प्रगती
मला सांगताना खूप आनंद होत आहे की माझी मुलगी आराध्या मध्ये शाळेत आल्यापासून खूप सकारात्मक बदल झाले आहेत. यासाठी मी शाळेचे आणि सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानते. आराध्या मध्ये झालेले काही बदल सांगू इच्छिते.
ती आता रोज सकाळी लवकर उठते आणि कारण नसताना शाळा बुडवत नाही. शाळेतला डबा पूर्ण संपवते आणि त्यामुळे घरी देखील स्वतःच्या हाताने जेवते आणि ताट स्वच्छ करते. शाळेतून आल्यावर गणवेश नीट काढून घडी करून ठेवते. शाळेत शिकवलेले श्लोक आजीला म्हणून दाखवते. रात्री लवकर झोपते. असे अनेक चांगले बदल तिच्यात पाहायला मिळत आहेत.
या सर्व बदलांसाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
— जयश्री आ. गायकवाड
ऑगस्ट महिन्यात एक ताई तिच्या तीन वर्षाच्या मुलाला घेऊन माझ्यासमोर आल्या. चेहऱ्यावर तणाव, डोळ्यात पाणी. मी विचारले, "काय झाले ताई?" त्या म्हणाल्या, "माझ्या मुलाला कोणत्याच शाळेत प्रवेश मिळत नाही. एका इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला होता, पण काही दिवसांनी त्यांनी भरलेले १५,०००/- रुपये परत केले आणि सांगितले की, 'आम्ही या मुलाची जबाबदारी घेऊ शकत नाही.'"
ताईंना जवळच राहणाऱ्या लोकांनी वधिर्नीतील पाकोळी बालवाडीबद्दल सांगितले. त्यामुळे त्या मुलाच्या प्रवेशासाठी इथे आल्या. इथे आलेली सर्व मुलं एकसारखीच असतात, या विचाराने मी त्याला छोट्या गटात प्रवेश दिला. सुरुवातीला लोकेश खूप रडायचा, ओरडायचा, पण शिक्षकांनी त्याच्यावर विशेष लक्ष दिले. खेळ आणि गोष्टींमधून त्याला आपलेसे केले.
आता तो आनंदाने शाळेत येतो, ताईंनी सांगितलेला प्रत्येक शब्द लक्षात ठेवतो, त्याचे वर्तनही सुधारले आहे. ताईंचे वाक्य मला वारंवार आठवते, "मी खूप हताश झाले होते, पण तुमच्या बालवाडीमुळे मला आशेचा किरण दिसला."
— सौ. राणी काळे
मी सौ. संगीता तावरे. वधिर्नीमध्ये ऑक्टोबर १८ ला बालवाडी शिक्षिकेच्या वर्ग करण्यासाठी प्रवेश घेतला. भेकराईनगरच्या हरपळे वस्तीतील बालवाडीमध्ये सौ. मनीषाताई धेंडे यांच्या सोबत काम करून प्रत्यक्ष अनुभव मिळवायला लागले.
१५ मार्च २०२० ला कोरोनाचे प्रतिबंध लागू झाल्याने आम्ही मोबाईलच्या माध्यमातून नवीन शिक्षण पद्धती शिकून मुलांशी संवाद साधू लागलो. गावच्या घरी गेल्यावर तुळशी वृंदावनासमोर बसून मुलांना रांगोळीत रंग भरणे, पूजा साहित्याचा परिचय, कडुलिंबाच्या लिंबोळ्यांनी विविध आकार बनवणे असे घरातील साधने वापरून मुलांना शिकवू लागले. अशा प्रकारे नवनवीन विषय शिकवायला लागले.
— सौ. संगीता तावरे
नमस्कार. मी वेदांतची मम्मी, सौ. वर्षा मंगेश साखरे. या कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागेल, याची कल्पना नव्हती. पण ‘स्व'-रूपवधिर्नी पाकोळी शाळेमार्फत आमच्या पालक ग्रुपवर शिक्षिका मुलांसाठी नवनवीन उपक्रम पाठवतात. शाळा बंद असली तरी मुलांचा अभ्यास झाला पाहिजे, असे त्यांना मनापासून वाटते. आपण पालकांनीही यासाठी पुढाकार घेऊन आपल्या मुलांकडून अभ्यास पूर्ण करून घ्यावा. यामुळे मुलं आनंदी होतात आणि त्यांच्यात प्रगती दिसून येते. ‘स्व'-रूपवधिर्नी पाकोळी बालवाडीच्या सर्व शिक्षकांचे मनापासून आभार.
— सौ. वर्षा मंगेश साखरे
मी सौ. पुष्पा कांबळे, १५ जणांच्या कुटुंबात एकत्र राहणारी महिला. माझे यजमान पेस्ट कंट्रोलचा छोटा व्यवसाय करतात, आणि मी त्यांना शिवणकामाने मदत करते. आमचे घर लहान पडले होते, म्हणून आम्ही नवीन जागा घेण्याचे ठरवले. यासाठी मी बचत गटातून कर्ज घेतले आणि त्याची नियमित फेड करत आहे.
— सौ. पुष्पा कांबळे
माझ्या आईला कॅन्सर झाला आणि डॉक्टरांनी ऑपरेशन व पुढील उपचारांशिवाय पर्याय नाही असे सांगितले. यासाठी लागणारा खर्च खूप मोठा होता, त्यामुळे मी बचत गटातून कर्ज घेतले. आज माझ्या आईची तब्येत उत्तम आहे. बचत गटाच्या मदतीने हे शक्य झाले.
— सौ. रोहिणी मोहीते
रुपरंग वा असो गंधही | यातील माझे काहीच नाही |
श्रेयाचा मज नको लेशही | निर्माल्यात विरावे ||
विकसित व्हावे, अर्पित होऊन जावे ||